लातूर - आधी बोगस बियाणे, मग कुठे कमी पाऊस तर कुठे जास्त पाऊस, त्यात कपाशीवरील बोंडअळी तर सोयाबीनवर आलेल्या खोडकिडींमुळे शेतकरी संकटात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सातत्याने सामना करावा लागत आहे. अशातच कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून इस्लामवाडी येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
परतीच्या पावसामुळे पीक पाण्यात गेले-
अल्पभूधारक गोविंद आंबूलगे हे उदरनिर्वाहसाठी पुणे येथे गेले होते. केळी विक्रीच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि गोविंद आंबूलगे यांचे हातचे कामही गेले. त्यामुळे त्यांनी गावाजवळ शेती व्यवसायाला सुरवात केली होती. खरिपात 60 गुंठ्यामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. पण परतीच्या पावसामुळे पीक पाण्यात गेले. त्यामुळे उरलेली आशाही मावळली होती.
तननाशक औषध केले प्राशन-
यामध्येच गोविंदराव यांची मुलगी रेणुका ही लग्नाला आली होती. पण घरची परिस्थिती हालकीची आणि चार लाखाचे कर्ज याला त्रासून त्यांनी शेतामध्ये तननाशक औषध प्राशन केले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी उदगीर येथे हलविले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
शिवाय गोविंद आंबूलगे हे कॅन्सरसारख्या आजारानेही त्रस्त होते. कर्ज, नापिकी आणि आजारपणाला त्रासून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
हेही वाचा- दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची आत्महत्या; अमरावतीच्या ममदापूर येथील घटना
हेही वाचा- सदाभाऊंनी काय साध्य केलं; पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट