लातूर - निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली असून जनावरांना चारा आणि दोन वेळच्या पाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना जीवाचे रान करावे लागत आहे. जिल्ह्यातील लोकांना पावसाळ्यात उन्हाळ्याची अनुभूती होत आहे. तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही त्यामुळे जगावे की मरावे, अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर आता पावसाळ्यात तरी हा प्रश्न सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, सरासरीच्या केवळ ३८ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. खरीपातून उत्पादन तर सोडाच, मात्र बियाणे गाढण्यासाठी झालेला खर्च देखील पदरी पडेल की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.
जनावरांसाठी चारा नसल्याने इतर जिल्ह्यातून चारा आणण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. कडब्याचे दर ५ हजार रुपये शेकडा असल्याने जनावरे जगवावी कशी, असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. घरी आणि शेतामध्येही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आता स्थलांतरात वाढ होऊ लागली आहे. कामाच्या शोधात ग्रामस्थांचा ओढा शहराकडे वाढला आहे.
अशी स्थिती असतानाही चारा छावणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा, जिल्हा प्रशासनाकडून दिला जात आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि जुलमी प्रशासन यामध्ये शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या यात्रेत मुख्यमंत्र्यांनी राजकीय स्वार्थाबरोबर लातूरच्या जनतेच्या प्रश्न देखील जाणून घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.