लातूर - जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न सर्वश्रुत आहे. या पाणीटंचाईच्या काळात एक ना अनेक उपक्रमावर चर्चा, बैठका होतात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होते. म्हणून दयानंद शिक्षण संस्थेने एक आदर्शवत उपक्रम हाती घेतला आहे.
हा प्रकल्प दोन महिन्यात तयार झाला असला तरी याचा वापर आणि गरज लक्षात घेण्यासारखी आहे. 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीमध्ये याचे उदघाटन झाले आहे. लहान मोठ्या संस्थांनी असे प्रकल्प उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - कोंबडीविना उबविता येणार अंडी, यवतमाळच्या विवेकने बनवले अनोखे यंत्र
या उपक्रमांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जात आहे. या पाण्यावर महाविद्यालय परिसरातील झाडे आणि मैदान हिरवेगार केले जात आहे. त्यामुळे पाणी समस्येचा बाऊ न करता त्यावर पर्याय काढता येऊ शकतो, याचे उदाहरण समोर उभे केले आहे. शहराला १० दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. यंदा तर भर पावसाळ्यात शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही आणि महाविद्यालयीन परिसरातील झाडे आणि संस्थेने उभा केलेले क्रिकेटचे मैदानावर हिरवेगार कशी ठेवता येईल, यातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - अकोला कृषी विद्यापीठात खाकी रंगाच्या कापसाचे उत्पादन, देशातील पहिलाच प्रयोग
महाविद्यालय परिसरात ६०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. दिवसाला हजारो लिटर पाण्याच्या अपव्यय होत होता. या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा मानस संस्थेने घेतला होता आणि तो दोन महिन्यात यशस्वी देखील केला आहे. यात गटारातून जाणारे पाणी अडविण्यात आले आणि ३५ हजार लिटरच्या टाकीत जमा केले जाते. प्रक्रिया केल्यांनतर अवघ्या काही वेळातच हे पाणी शुद्ध होते. शुद्ध झालेल्या पाण्यासाठी ८० हजार लिटरच्या टाकीत साठवले जाते. हेच साठवलेले पाणी आता झाडांना, क्रिकेटच्या मैदानाला एवढेच नाही तर बांधकामसही वापरले जात असल्याचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण लाहोटी यांनी सांगितले आहे.