लातूर- येथील औसा तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या किल्लारी ग्रामपंचयतीच्या कारभाराला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्यामुळे विकास खुंटला आहे. गावाला मुलभूत सोई-सुविधाही मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. १४ व्या वित्त आयोगातून भरघोस निधी मिळूनही लोकप्रतिनीधी आणि आधिकाऱ्यांच्या साट्यालोट्यामुळे मोठा अपहार होत असल्याचा आरोप केला जात आहे. यामधील सत्य बाहेर काढण्याच्या दृष्टीने भर ग्रामसभेतच गावातील कामांवर झालेल्या खर्च काढण्यात आला आहे.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला धक्काबुक्की
काम छोटे खर्च मोठे
१९९३ च्या भूकंपानंतर किल्लारी या गावचे पूर्ण पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर विकास कामासाठी नेहमी मदत मिळाली आहे. मात्र, सरपंच शैला लोहार, ग्रामविकास अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे मंजूर झालेला निधी कामावर खर्च केला जात नाही. गावातील केवळ एलईडी लाईट दुरुस्तीसाठी १ लाख ६८ हजार, शाळेतील ई-लर्निंग साहित्याच्या खर्चासाठी तब्बल २ लाख ९५ हजार, बोअरवरील इंधन, विहीर रिबोअर करण्यासाठी १ लाख ३५ हजार, १८ वॅटचे एलईडी बल्ब प्रती ६४५ रुपयांनी खर्च करून यामध्ये लाखोंचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
अद्याप चौकशी नाही
यासंदर्भात १८ मार्च २०१९ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी तक्रारही दाखल केली आहे. मात्र, कारवाईकडे कानडोळा केला जात आहे. कामांवर झालेल्या खर्चाचे विवरण करण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक लेखा परीक्षण समितीच स्थापनच केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील मनमानी कारभार वाढला असून ग्रामस्थ मात्र सोई-सुविधांपासून दूर राहत आहेत. गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सदरील कामांबाबत कसलीही चौकशी केलेली नाही.