लातूर - जिल्ह्यात दीड महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांची दिवसाकाठीची संख्या ही 400 ते 500 च्या वर होती. तर गेल्या 15 दिवसांपासून यामध्ये कमालीची घट झाली आहे. चार दिवसांपूर्वी सर्वात कमी म्हणजे 39 रुग्ण आढळून आले. ही दिलासादायक बाब असली तरी रुग्णसंख्या समोर येऊ दिली जात नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. त्याअनुषंगाने 'ईटीव्ही भारत' ने प्रत्यक्ष तपासणी केंद्रावरील स्थिती काय आहे? याचा आढावा घेतला. रुग्णसंख्या लपवली जात नसून तपासणी करण्यासाठी नागरिकच केंद्राकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. शिवाय घरोघरी जाऊन केली जाणारी तपासणीही आता बंद आहे.
मे-जून महिन्यात धोका पातळीमध्ये गेलेल्या लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार 186 एवढी झाली आहे. तर 18 हजार 806 एवढे रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. केवळ लातूर जिल्ह्यातच नाही तर सर्वत्र हीच स्थिती आहे. 26 ऑक्टोबर रोजी तर जिल्ह्यात केवळ 39 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रुग्णसंख्या घटली की लपवली? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, नागरिकांनी तपासणी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
संख्या वाढली तर लगेच सर्वकाही सुरू केले जाणार
सुरुवातीच्या काळात लातूर शहरात 7 तपासणी केंद्र, शिवाय जागोजागी 'कॅम्प' सुरू करण्यात आले होते. या दरम्यान, दिवसाकाठी 500 वर रुग्णसंख्या गेली होती. पण, गेल्या आठ दिवसांत एकदाही रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केलेला नाही. जळकोट, शिरुरानंतपाळ तालुक्यात एकही रुग्ण नाही तर जिल्ह्यातील 7 कोविड सेंटर हे रुग्ण नसल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. तर शहरातील 5 तपासणी केंद्रही बंद करण्यात आलेली आहेत. रुग्णसंख्येत घट हे वास्तव आहे. नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पण, दीड मान्यपूर्वीची स्थिती आणि आज आढळून येत असलेले रुग्ण यामध्ये खूप मोठा फरक आहे. शिवाय यंत्रणेवर विनाकारण होणारा खर्च टाळण्यासाठी हे सेंटर बंद करण्यात आले आहेत. उद्या संख्या वाढली तर लगेच सर्वकाही सुरू केले जाणार आहे. त्यामुळे संख्या लपविण्याचा प्रश्नच नाही, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
रुग्णसंख्या घटत असली तरी धोका कायम
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. सध्या जिल्ह्यात केवळ 776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण लक्षणे असूनही नागरिक तापसणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. उपचाराकडे दुर्लक्ष केले तर कुटुंबातील वयोवृद्धांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. एकीकडे संख्या घटत असली तरी मृत्यू प्रमाण कायम असल्याने धोका टळलेला नाही असे वैद्यकीय अधिकारी सुधा राजूरकर यांनी सांगितले आहे.
काय आहे लातूर जिल्ह्याची स्थिती?
जिल्ह्यात 29 ऑक्टोबर पर्यंत एकूण 20 हजार 186 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 18 हजार 806 रुग्ण हे बरे झाले आहेत. शिवाय 776 रुग्णांवर उपाचार सुरू असून 604 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.