लातूर - निलंगा तालुक्यातील पालापूर येथील शेतकरी रतन पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी निलंगा पोलिसांनी चार सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून पाटील यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचा मुलगा रवीशंकर (वय २२) यांनी नोंदवली होती.
रतन श्रीमती पाटील (वय ५२) वर्षे यांचा निलंगा येथे हॉटेल व्यवसाय होता. काही अडचणींमुळे त्यांनी चार खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. दर महिन्याला हे सावकार हॉटेलवर येऊन व्याज घेऊन जात असे. मात्र, व्यवसाय मंदावल्याने कर्जाचे व्याज आणि घरप्रपंच चालवणे कठीण झाल्याने पाटील यांनी व्याज देणे बंद केले. मुद्दलीपेक्षा व्याज जास्त जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. याला आक्षेप घेत हे सावकार रोज घरी येऊन पाटील यांना धमकी द्यायचे. 'शेत लिहून दे नाहीतर घरावरचे पत्रे काढू' असा दम ते पाटील यांना देत होते. याला कंटाळून १६ जानेवारीला सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा - 'रक्त सांडून मिळवलेली मुंबई विकून जाऊ नका'
पाटील यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर आरोपी सतिश रायजी बिराजदार (रा. कोराळी, ज्ञानोबा जाधव पेठ, निलंगा), अतिश मिरकले, दिपक गवळी (कासारशिरसी) यांच्यावर भादंवी ३०६, ३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी सतिश रायजी बिराजदार आणि दिपक गवळी यांना ताब्यात घेत अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हाबीब खान पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.