लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूरमधील उदगीर तालुक्यातून समोर आली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
बसमध्येच आत्महत्या
संजय केसगिरे यांनी उदगीर आगारात थांबलेल्या एसटी बसमध्ये बॅगच्या बेल्टने लटकावून घेत गळफास घेतला. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केसगिरे यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेवर सगळीकडून शोक व्यक्त होत आहे.
अहमदनगरमध्येही एसटी चालकाची आत्महत्या
दरम्यान या घटनेपूर्वी अहमदनगरच्या संगमनेरमधील बस स्थानकातही एका चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. कर्जबाजारीपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. संगमनेर बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये चालक सुभाष तेलोरे यांनी आत्महत्या केली होती. मुक्कामी थांबलेल्या बसमध्ये त्यांनी आत्महत्या केली होती.
धुळ्यातही एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
धुळ्यातील साक्रीमध्येही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने पगार होत नसल्याने आर्थिक अडचणींच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. कमलेश बेडसे यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
हेही वाचा - महाराष्ट्राची लालपरी झाली ७३ वर्षांची; जाणून घ्या, इतिहास