लातूर - भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच अंतर्गत बंडाचे पेव फुटत आहे. औसा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी स्वीयसहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देताच अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. मतदारसंघातील भूमीपुत्रच उमेदवार मान्य असल्याचे येथील शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना सांगितले आहे. या मागणीसाठी बुधवारी औसा येथे रास्तारोको करण्यात आला.
हेही वाचा - औसातून मुख्यमंत्र्यांचे पीए तर निलंग्यामध्ये पुन्हा काका-पुतण्यात लढाई
औसा हा शिवसेनेचा परंपरागत मतदार संघ असून यंदा भाजपला सोडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीयसहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याचा निर्णय म्हणुन जिल्हा परषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी सोमवारी बंडखोरी केली. बुधवारी औसा येथे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, अरविंद पाटील निलंगेकर यांनी रास्तारोको केला. आतापर्यंत बाहेरच्या उमेदवारालाच संधी मिळाली असून किमान यावेळी तरी भूमिपुत्र आमदार व्हावा याकरता हे आंदोलन केले जात आहे.
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याठिकाणी येऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. भूमीपुत्राच्या मागण्या तीव्र असून पक्षश्रेष्ठींना बोलून यावर दोन दिवसात तोडगा काढणार असल्याचे संगीतले. उमेदवारी मिळवण्यापासून ते प्रचारापर्यंत अभिमन्यू पवार यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. आता हे अंतर्गत मतभेद मुख्यमंत्री यांच्या दालनात सोडवले जातील असे चित्र आहे.
आंदोलनात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचा सहभाग असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्थानिकाला उमेदवारी मिळण्याची मागणी दिनकर माने, बजरंग जाधव, अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - विलासरावांचे धाकटे चिरंजीवही निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून रमेश कराडांचा पत्ता कट