लातूर - गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी काही प्रमाणात का होईना दिलासा देणारे अहवाल समोर आले आहेत. जिल्ह्यात 21 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून औसाचे आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या मुलाचाही अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
बुधवारी 216 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. पैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 15 अनिर्णित 6 जणांचे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. यामध्ये लातूर 8, निलंगा 7, उदगीर 4 तर अहमदपूर आणि देवणी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाची भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी प्रमाणात असली तरी अद्याप धोका कायम आहे. उदगीर उपजिल्हा रुग्णालयात एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 244 व्यक्तींवर उपचार सुरू असून 298 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. सर्वाधिक 91 रुग्ण हे केवळ लातूर शहरात आढळून आलेले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन संदर्भांत कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 27 जणांना जीव गमवावा लागला आहे.
औसाचे आमदार अभिमन्यू पवार व त्यांचा मुलाला कोरोना
औसा मतदार संघाचे आमदार यांना व त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या घरालगतचा विशाल नगरातील भाग हा सील करण्यात आला आहे. शिवाय गेल्या सहा दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाईन होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.