लातूर - महाविकास आघाडी सरकारवर आतापर्यंत वेगवेगळ्या नावाने टीका झाली आहे. कधी तीन चाकांचे सरकार तर, कधी आघाडीत बिघाडी! मात्र लातुरात माजी राज्य कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे. हे एका गेंड्याच्या कातडीचे सरकार नाही तर, तीन गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. यामुळे या सरकारला ना ऐकायला येते, ना काही दिसते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना त्यांनी ही टीका केली.
तीन पक्षांच्या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय एकमुखाने होत नाही. केवळ काँग्रेसने विरोध केल्यामुळे राज्यात कृषी कायद्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि दलालांना बाजूला करण्यासाठी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळणार आहे. केवळ दलाल पोसण्यासाठी राज्य सरकारने याला विरोध केल्याची टीका यावेळी अनिल बोंडे यांनी केली. परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून लातुरात बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, रमेश पोकळे, गणेश हाके उपस्थित होते.