लातूर - लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकांना अवकाश असतानाच भाजपने 220 जागांवर दावा केला आहे, हे लोकशाहीला घातक आहे. त्यांचा हा अतिआत्मविश्वास म्हणजे ईव्हीएम मशीन छेडछाड करण्याचा मनसुबा असल्याचा घणाघात, वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाचे सदस्य अॅड. अण्णाराव पाटील यांनी केला आहे.
सध्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी आता विधानसभेच्या तयारीला लागली आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. सध्या इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, आमदार, खासदार एवढेच नाही तर मंत्री देखील वंचित आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी पाटील यांनी केला.
वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी हा लढा उभा केला आहे. त्यामुळे लोकसभेपेक्षा व्यापक संघटन या निवडणुकीत केले जाणार आहे. योग्य व्यक्तित्वालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकांपूर्वीच भाजपाने 220 जागांवर दावा केला आहे, हा आत्मविश्वास एवढ्या सहजतेने न घेता यामागे ईव्हीएम मशीनचे गौडबंगाल आहे. या मशीनमध्येच छेडछाड करण्याचा त्यांचा मनसुबा असल्यानेच ते एवढ्या विश्वासाने 220 जागांवर हक्क सांगत असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला. तर काँग्रेससोबत चर्चा होईल त्यानुषंगाने वरिष्ठ स्थरावर पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगत अजूनही काँग्रेससोबत युती होईल, असा आशावाद पाटीय यांनी कायम ठेवला.
मंगळवारी दिवसभर लातूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या बैठका सुरू होत्या. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातून इच्छुकांची गर्दी होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, किसन जाधव, यांच्यासह रेखा ठाकूर यांची उपस्थिती होती.