लातूर - देशभरातील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाचे पडसाद लातूरमध्येही उमटले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.
बँक कर्मचारी हे दोन दिवसांच्या संपावर आहेत. आज (शुक्रवारी) या संपाला सुरुवात झाली आहे. देशभरातील एकूण दहा लाख पन्नास हजारपेक्षा जास्त कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. तसेच संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
हेही वाचा - बँक कर्मचाऱ्यांचा संप; रखडले एकूण २३ हजार कोटी रुपयांचे धनादेश
या कारणासाठी पुकारला संप -
नोव्हेंबर 2017 साली देय असलेला वेतन वाढ अद्याप मिळालेला नाही. सरकार पगार वाढ द्यायला तयार नाही. त्याबद्दल सरकार जे विविध कारणे देत आहे, ती बँक कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत. बँकेत झालेला तोटा हे मुख्य कारण सरकार सांगत आहे. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षांमध्ये 12 लाख 25 हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. त्यापैकी ११ लाख कोटी रुपये हे थकीत कर्जाच्या पोटी वापरण्यात आले आहेत. सर्व कर्ज या देशातल्या बड्या भांडवलदारांच्या आणि कॉर्पोरेटच्या घशात गेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आवश्यकच होता. मग राजकारणीच किंवा सत्ताधारी जर बँकेला तोटा झाला आणि पगार वाढ देत नसेल, असे सांगत असतील तर ते आम्ही मान्य करणार नाहीत, असे बँक कर्मचारी सांगत आहेत.
हा तोटा भरून काढण्यासाठी सरकार बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांवर विविध सेवा कर लावत आहे. तसेच त्यातून ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे अतिशय अन्यायकारक आहे. बँकेचा जो नफा आहे आणि जी राष्ट्रीय संपत्ती आहे. ती काही थोड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याची सरकारची नीती आहे. हे आंदोलन दडपशाहीने चिरडून टाकले जात आहे, असा आरोपही बँक संघटनांनी केला आहे.
मात्र, सरकारच्या नीतीमुळे बँक कर्मचारी हे आंदोलन मागे घेणार नाहीत. तसेच यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मार्च महिन्यात तीन दिवस तसेच एक एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशाराही बँक कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.