लातूर - शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत असतानाच शेतीची सरकारी मोजणीसाठी १ हजार रुपयांची लाच मागणारा भूमिअभिलेख अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. औसा येथील भूमिअभिलेख कार्यालय परीसरात सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
आनंद माणिकराव कुलकर्णी (४५) असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. तक्रारदार शेतकऱ्याने शेत जमीन मोजून घेण्यासाठी कार्यालयात शूल्क भरले होते. मात्र, तातडीने मोजणी करतो म्हणून कुलकर्णी यांनी त्यास १ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर शेतकऱ्याने लातूर येथील लाच लूचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी सकाळी भूमिअभिलेख कार्यालय परीसरातच ही रक्कम स्वीकारताना आनंद कुलकर्णीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.