लातूर - सोमवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास अहमदपूर, रेणापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बीच्या पिकांची काढणी झाली असल्याने धोका टळला असला तरी फळबागांना मात्र याचा फटका बसला आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा सातत्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातारण निर्माण झाले होते. दुपारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या तर सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी उशिरा पेरणी झालेल्या रब्बी पिकांना आणि फळबागांना याचा फटका बसला आहे. सध्या आंब्याला मोहर लागला असून गळतीचा धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे टरबूज आणि खरबूजावर करपा रोग संभावू शकत असल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रेणापूर तालुक्यातील भोकरंबा, मोटेगावसह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.