लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस दल कोरोनाचा सामना करण्यासाठी युद्पातळीवर काम करत आहेत. अनेक सामान्य नागरिकही आपापल्यापरिने प्रशासनाला मदत करत आहे. शिवणी कोतल येथील तरुणांनी ही 'अँटी कोरोना फोर्स'ची निर्मिती करुन एक अनोखा उपक्रम राबवला आहे. जो तोंडाला मास्क लावत नाही त्याच्या गाडीला 'मी गाढव आहे', असा फलक हे तरुण लावतात आणि फोटो काढतात.
निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल आणि गुणेवाडी या दोन गावातील अँटी कोरोना फोर्सच्या तरुणांनी शक्कल लढवत रस्त्यावर असलेल्या चेकपोस्टवर मी गाढव आहे, असे फलक लावले आहेत. तोंडाला मास्क न बांधता जो गावात फिरतो त्याची गाडी हे तरुण आडवतात. 'मी गाढव आहे', असे लिहलेला फलक त्याच्या पाठीमागे धरून फोटो काढतात व तो सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यामुळे त्या मार्गावरून जाणारे लोक मास्कचा वापर करत आहेत. तरुणांच्या या अनोख्या उपक्रमाचे सरपंच नाना शेळके यांनी कौतुक केले आहे.