लातूर - शहरात आजपासून दोन दिवसीय ७ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. माजी केंद्रीय मंत्री शिवराज चाकूरकर आणि आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन झाले. कवी इंद्रजीत भालेराव हे संमेलनाध्यक्ष आहेत.
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली होती. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून यावेळी संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. आज दिवसभरात परिसंवाद, कविसंमेलन पार पडणार आहेत. 'शैक्षणिक दृष्ट्या महत्वपूर्ण अशा शहरात हे साहित्य संमेलन पार पडत असून याचा फायदा शिक्षकांना तसेच येथील विद्यार्थ्यांना होईल, असे मत यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : अखेर वेळ ठरली... दोषींना 3 मार्चला फाशी
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी चर्चासत्र, कविसंमेलनासह जिल्ह्यातील दोन आदर्श शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनाचे संयोजक म्हणून कालिदास माने यांनी पुढाकार घेतला असून राज्यभरातील मान्यवर या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO: म्यानातून उसळे तलवारीची पात; वेडात मराठे वीर दौडले सात..
काँग्रेसच्या नेत्यांची संमेलनाला दांडी
काँग्रेसतर्फे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाला काँग्रेसच्याच नेत्यांनी दांडी मारली आहे. कार्यक्रम पत्रिकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे यांची नावे आहेत. मात्र, यापैकी एकही मंत्री किंवा आमदार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.