लातूर - जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ६४७ शाळा असल्या तरी सोमवारी ५४२ शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटींचे पालन केले जात आहे. शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचा आढावा घेतला आहे. याकरिता पालकांचे संमती पत्रही घेण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेऊन सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून शाळा परिसरात शिक्षकांची टेस्ट केली जात आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २ हजार ५०० शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय शाळा परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाबाबत शाळांमध्ये 'ही' खबरदारी घेण्यात येणार
शाळेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायजर दिले जाणार, तसेच ताप तपासणी यंत्र ठेवण्यात येणार आहे. एका वर्गात २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सोमवारी केवळ इयत्ता ९ वीचे वर्ग भरणार आहेत, तर मंगळवारी इयत्ता १० वीचे वर्ग भरले जाणार आहेत. आज लातूर शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. शिवाय उर्वरित शिक्षकांची तपासणी ही २ दिवसात पूर्ण केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी सांगितले.
पालकांकडून घेण्यात आले समंती पत्र
शाळा सुरू होण्यापूर्वी खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांचे समंती पत्र घेण्यात आले आहेत. पालकांनी शाळेत येऊन, तर काहींनी सोशल मिडियावद्वारे हे पत्र शाळेकडे जमा केले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या कमी आढळून आल्याने उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत. सकाळी ८ वाजता सर्व तपासणी करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
हेही वाचा - 'वर्षभर संकटाचा सामना; मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही सरकार विकास कामांसाठी कटिबद्ध'