लातूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. रविवारी दिवसभरात 25 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये लातूर, उदगीर आणि अहमदपूर येथील रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 240 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी 19 जणांचे अहवाल तर शनिवारी प्रलंबित 25 अहवालांपैकी 6 जणांचे, असे एकूण 25 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे लातूरकरांच्या चिंतेत भर पडली असून दिवसाकाठी रुग्णांची संख्या वाढतच आहे.
वाढत्या रुग्णांची संख्या पाहता लातूर शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे केली होती. मात्र, लॉकडाऊन हा पर्याय नसून शहरातील बाजारपेठ सुरू राहणार हे स्पष्ट झाले आहे. मृत्यूमध्ये वयोवृद्धांची संख्या जास्त असली, तरी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबर मृत्यूची संख्याही वाढत आहे. सध्या रुग्णालयात 196 जणांवर उपचार सुरू असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारपासून नियमांची कडक अंमलबजावणी - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन हा त्यावरचा पर्याय नाही. मात्र, नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्यास भाग पडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दुकानांमध्येमध्ये किंवा बाजारपेठेत वयोवृद्ध नागरिकांना येता येणार नाही. शिवाय, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.