लातूर - महिला-तरुणींना जीवंत जाळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंगणघाट येथील प्रकार सुरू असतानाच गुरुवारी रात्री लातुरात एका १८ वर्षीय तरुणीला अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची घटना समोर आली आहे. घटनेमागचे कारण आद्यपही अस्पष्ट असून शहरातील सर्वोपचार रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
शहरातील दिपज्योति नगरमधील वास्तव्यास असलेल्या १८ वर्षीय तरुणीला घराजवळच अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तरुणीचा चेहरा जळाला असून ती १५ टक्के भाजली आहे. या घटनेमागचे कारण अद्यापही समोर आले नाही. नेमका हा प्रकार तिच्या घरासमोरच झाला असल्याने तर्क- वितर्क मांडले जात आहेत. तरुणीवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवल्यावरच नेमका काय प्रकार झाला, हे समोर येणार आहे.