कोल्हापूर - गेल्या महिन्यात शेतीच्या किरकोळ वादातून एका युवकाचा बळी घेल्याची घटना ताजी असतानाच करवीर तालुक्यातही आता शेतीच्या किरकोळ वादावादीतून एका 30 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. किशोर उर्फ काशीनाथ सत्ताप्पा पाटील (रा. कुरुकली ता. करवीर) असे या मृत युवकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी गावातील एका किरण नावाच्या तरुणासोबत किशोरची किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती आणि तोच राग डोक्यात ठेवून किरणने किशोरचा कोयत्याने सपासप वार करून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
मृत किशोर आणि संशयित आरोपी किरण दोघेही कुरुकली गावचेच रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. यांच्यात शेतातील गवत कापण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयाजवळील रस्त्यावरच किशोरच्या मानेवर वार करून संशयित किरणने त्याची निर्घृण हत्या केली. स्वतः किरणने पोलीस ठाण्यात हजर होऊन याबाबत माहिती दिली असल्याचे समजले आहे. खरे तर, गेल्याच महिन्यात अशा प्रकारची घटना घडली होती. त्यात आता पुन्हा त्याच किरकोळ कारणावरून जिल्ह्यात दुसरी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पोलीस दाखल झाले असून ते अधिक तपास करत आहेत.