कोल्हापूर - सध्या देशात युध्दज्वर चांगलाच वाढू लागला आहे. मात्र, सीमेवर प्राण गमावलेल्या जवानांच्या वीरपत्नींचा त्यागही त्यांच्याइतकाच महत्वाचा आहे. मात्र, त्यांचे अबोल दु:ख पडद्याआडच राहून जाते. हातकणंगले तालुक्यातील चावरे गावातील एक वीरपत्नी सुजाता पाटील यांचीही काहिशी अशीच व्यथा आहे.
चावरे गावातील सर्जेराव भीमराव पाटील यांचा विवाह १९९१ साली सुजाता पाटील यांच्यासोबत झाला होता. लग्नासाठी २० दिवसांच्या सुट्टीवर आलेले लग्न आटोपून परत कर्तव्यवर परतले. ६ महिन्यांनंतर पुन्हा परत येण्याच्या बोलीवर गेलेल्या सर्जेराव यांचा थेट अस्थीकलशच परत आला. सुजाता यांच्यासोबत त्यांची चांगली ओळखही झाली नव्हती. या घटनेने सुजाता यांना प्रचंड धक्का बसला. त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्लाही देण्यात आला. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. जवान सर्जेराव यांची वाट त्या बघत आहेत. गेली २७ वर्षे पतिच्या विरहात जगणाऱ्या या वीरपत्नीकडे त्यांच्यासोबतच्या विशेष आठवणीही नाहीत. तरीही सर्जेराव यांची वाट पाहत ते कधीतरी परत येतीलच या आशेवर गेली २७ वर्षे त्या जगत आहेत. देशात युध्द झाले पाहिजे किंवा इतर काही अराजक भाषा करणाऱ्यांना या आणि अशा कित्येक वीरपत्नींचं दु:ख समजून घेता आले तर निश्चितच त्यांचा आवेग कमी होण्यास मदत होईल.