कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत सरकारचा होमवर्क चांगला झाला होता. शिवाय मागच्यावेळच्या चुका सरकारने दुरुस्त केल्या होत्या. तसेच आजच्या सुनावणीमध्ये आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली असताना, पुढची तारीख का मागितली हा माझ्यासारख्या माणसाला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने याचा खुलासा करावा असे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. पाच सदस्यीय घटनापीठसमोर ही सुनावणी झाली. यामध्ये पुढील सुनावणी 25 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती आता कायम राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढच्या सुनावणीला तरी सरकारने होमवर्क चांगल्या पद्धतीने मांडावा
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिवाय मोठी आंदोलने झाली आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता 25 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून, आरक्षणाला स्थगिती कायम राहणार आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीला तरी सरकारने केलेला होमवर्क चांगल्या पद्धतीने मांडावा. शिवाय एकदाचा काय तो निकाल लागू द्या, मग तो सकारात्मक असो कींवा नकारात्मक तो लागणे महत्तवाचे आहे. आम्ही समाजासमोर कितीवेळा जायचे आणि त्यांना कितीवेळ वेठीस धरायचे असा सवालही संभाजी राजेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी याबाबत भेट घेणार असून, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. शिवाय कालसुद्धा त्यांनी मला मोठ्या मनाने फोन करून कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, याबाबत सविस्तर सांगितलं होतं. अशी माहितीही यावेळी संभाजी राजे यांनी दिली.