कोल्हापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रासाठी सुद्धा काही घोषणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातच कोल्हापूरातील शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा होत्या आणि कितपत शेतकरी समाधानी आहेत, याबाबत ईटीव्ही भारतने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम -
आज अर्थसंकल्प जाहीर झाला. मात्र, त्यातून पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मोदी सरकार दीडपट उत्पन्नाची घोषणा करत आले आहेत. मात्र, आजपर्यंत शेतजाऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. शेतकरी शेती क्षेत्राला कंटाळला आहे. केवळ घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीही अंमलात आणायचे नाही, हेच अनेक दिवसांपासून सुरू आहे. केवळ मन की बातमधून मोदी बोलतात. शेतकऱ्यांशी संवाद करायला त्यांच्याकडे वेळ नाही, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे -
दरवर्षी कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पातून निराशाच समोर येते. गेल्या वर्षी सुद्धा जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यातील किती योजना तुम्ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि किती जणांना याचा लाभ झाला, याचे स्पष्टीकरण सरकारने दिले पाहिजे. एकीकडे शेतकरी 70 दिवसांपासून कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष नाही वरून शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक भरीव घोषणा केल्याचे सांगतात हे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - आमिर खानची प्रतिज्ञा.. ‘लालसिंग चड्ढा’ प्रदर्शित होईपर्यंत 'ही' गोष्ट केली त्याग!