कोल्हापूर : मुख्यजलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बाधित होणार आहे. सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी कमी दाबाने पाणी मिळणार असल्यामुळे शहरवासीयांना अडचणिंचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी मोठ्या प्रणाणावर गळती लागली आहे.
महापालिकेने आता हे काम काढले आहे. सोमवारी गळती दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्या मुळे दिवसभर शहराला पाणीपुरवठा होणार नाही, मंगळवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याने ऐन पावसाळ्यात कोल्हापुरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील ई वॉर्ड, ए व बी वॉर्ड, त्यास संलग्नित उपनगरांना होणार पाणीपुरवठा आज होणार नसल्याने महापालिका प्रशासन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविणार आहे. मंगळवारीही काही भागातील शिंगणापूर मुख्य जलवाहिनीच्या गळती काढण्याच्या कामाचा परिणाम होणार असून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यंदा महापालिकेने उन्हाळ्यापासून पाणी कपात केलेली आहे. यातच अद्याप पावसाचा पत्ता नाही.
शहरात सध्या आधिच एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच जलवाहिन्यांना लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. दर पंधरा दिवसांनी, एक महिन्याने गळती काढण्याचे काम हाती घेतलेले असते. त्यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडीत होतो. आता सोमवारी पाणीपुरवठा बंद होणार आहे. मंगळवारी काही ठिकाणी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेकडून केले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली होऊन दीड महिना उलटला, अजूनही महापालिकेला पूर्ण वेळ प्रशासक मिळाला नसल्याने याचा परिणाम प्रशासकीय कामांवर होत आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शहराचा पाणीपुरवठा दर महिन्याला विस्कळित होतो आहे, गळती काढण्यासाठी मनुष्यबळ अपुरे असल्याने दोन दोन दिवस शहर वासीयांना मुबलक पाणी मिळत नाही, याचा जाब कुणाला विचारायचा असा सवाल आता नागरिक करत आहेत.
हेही वाचा :