कोल्हापूर - गोकुळची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे दररोजच वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकसुद्धा मतांचे गणित जुळवण्यासाठी अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. यातच आता सत्ताधाऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या समरजितसिंह घाटगे गटाने बंड करण्याचा पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी गटाकडून आम्हाला केवळ निवडणुकीपुरती जावयाची वागणूक दिली जाते. त्यांच्याकडून केवळ गृहीत धरायचे काम सुरू आहे. त्याला आमचा विरोध असून आमच्या गटाला सुद्धा गोकूळमध्ये उमेदवारी द्या असे समरजित घाटगे गटाने म्हंटले आहे. आज घाटगे गटातील ठरावधारकांचा मेळावा पार पडला त्यानंतर शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे पत्रकारांशी बोलत होते. शिवाय राजकारणात काहीही होऊ शकते म्हणत गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे.
कागलमध्ये समरजित घाटगे गटाचा मेळावा -
कागल येथे समरजीत घाटगे यांच्या गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात श्री शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजे गटाचे सर्व ठराव धारक कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळमध्ये राजे गटाला गृहीत धरण्याचे काम झाले आहे. मात्र, आता हे चालणार नाही. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी द्या, अन्यथा आमची बंडाची तयारी असल्याचे या मेळाव्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यामध्ये जवळपास दीडशे ठरावधारक समरजित घाटगे यांच्यासोबत असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी दिली. हे सर्व ठरावधारक कागल तालुक्यासह शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी अनेक ठरावधारक आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले.
एकदाही चर्चेला बोलावले नाही -
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर आहे. खरंतर दोन्ही गटाकडून या निवडणुकीत जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यावेळी सत्ताधाऱ्यांसोबतच राहणार असल्याचा सर्वात पहिला समरजित सिंह घाटगे गटाने निर्णय जाहीर केला होता. मात्र, आता आमच्या गटाला गृहीत धरले जात असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी एकदाही चर्चेला बोलावले नाही असे म्हंटले जात आहे. त्यामुळे आम्ही बंडाच्या तयारीत समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे. यावेळी विरोधकांकडून काही प्रस्ताव आल्यास आपली काय भूमिका असेल असे विचारल्यानंतर आम्ही सद्या सर्व कार्यकर्ते आमच्या भूमिका समरजित घाटगे यांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकते असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे इशारा राजे गटाने दिला आहे. त्यामुळे आता समरजित घाटगे याबाबत आता काय निर्णय घेतात हे पाहणे सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे.