कोल्हापूर - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या मंत्र्याच्या आदेशाने मतदार यादीत घोळ करण्यात आला, असा सवाल करत शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी थेट पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता आरोप केला. मतदार यादीत घोळ घालणाऱ्या व गैर कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अन्यथा महापालिका बंद पाडण्याचा इशारा इंगवले यांनी दिला. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला उकळी फुटली असून काँग्रेस-शिवसेना, असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - कोरोनानंतरच्या पर्यटनामुळे कोल्हापुरी 'पायतान'ला अच्छे दिन
पुढे इंगवले म्हणाले, आमचा प्रभाग क्रमांक 47, फिरंगाई मतदारसंघातील मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ केला आहे. आमच्या मतदारसंघाच्या यादीतून किमान 600 ते 1000 मतदार हे दुसऱ्या प्रभागातील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. तसेच, प्रभाग क्रमांक 47 फिरंगाईमध्ये मिराबाग, दुधाळी निगडे वसाहत, दांडगाईवाडी, संभाजीनगर, रंकाळा, आय.टी.आय, म्हाडा कॉलनी, शाहू कॉलनी, बळवंत नगर, वेताळ तालीम, खंडोबा तालीम, मरगाई गल्ली, हराळे गल्ली, वाशी नाका या भागातील मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत, असे इंगवले यांनी सांगितले.
एखाद्या मतदार यादीत 50 ते 100 नावांचा घोळ होऊ शकतो, पण कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने 600 ते 1000 मतदारांचा घोळ केला आहे. हा घोळ कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरून करण्यात आला? असा सवाल इंगवले यांनी केला. कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. इच्छुक उमेदवारांची पिछेहट झाली आहे, असे निदर्शनास आले म्हणून हा गैरप्रकार सुरू आहे काय? कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने असा आंधळा व बोगस कारभार कोणाच्या सांगण्यावरून केला, असे असेल तर संबधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबन करण्यात यावे, अशी मागणी इंगवले यांनी केली.
प्रभागात विकास कामे करायची व दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावे आमच्या प्रभागात. तसेच, आमच्या प्रभागातील नावे वेगवेगळ्या प्रभागात. आम्ही प्रचार करायचा की नावे शोधायची? ही सर्व जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची असून प्रभाग क्रमांक 47 फिरंगाईमधील इतर प्रभागात गेलेली सर्व नावे चार दिवसांत प्रभाग क्रमांक 47 फिरंगाई मतदार यादीत समाविष्ट करा. न केल्यास कोल्हापूर महानगरपालिकेस घेरावा घालण्यात येईल, अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा इंगवले यांनी दिला.
हेही वाचा - जगात भारी १९ फेब्रुवारी; कोल्हापूर शहरात शिवजयंतीचा उत्साह