कोल्हापूर - मानोली लघुपाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे मानोली धरण आहे. या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे अंदाजे वय तीस ते बत्तीस वर्ष असून माहिती कळताच शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार दत्तात्रय धोंडीबा गोमाडे हे मानोली गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते शेती व्यवसाय करत असून सोबत त्यांची जनावरे देखील असल्याने ते मानोली जंगलामध्ये जनावरे चरण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असतात. नेहमीप्रमाणे त्यांनी 20 मार्च रोजी देखील त्यांच्या जनावरांना घेऊन जंगलात गेले. त्यांना यावेळी एका अनोळखी महिलेची गळ्याभोवती मळकट पांढरे रंगाची ओढणी आवळून पडलेला मृतदेह आढळून आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे शरीर एका पत्र्याच्या पेटीत भरून ती पेटी बंद करून जंगलात एका कोपऱ्यात टाकून देण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे ही माहिती त्यांनी त्वरित शाहूवाडी पोलीसाना कळवली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच बेपत्ता असणार्या महिलेच्या नातेवाईकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - सोलापूर पोलिसांनी उस्मानाबाद अन् अहमदनगर जिल्ह्यातून आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या