कोल्हापूर- महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज (सोमवारी) मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे कोणते चेहरे महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये दिसतील ते आज स्पष्ट होणार आहे. मात्र, संभाव्य मंत्रीमंडळात येथील सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबीटकर यांच्या नावाच्या चर्चा आहे.
हेही वाचा- CAA Protest: दिल्लीतील शाहीन बाग परिसरात 'जेल भरो' आंदोलनाला सुरुवात
सतेज पाटील- मतदार संघ- कोल्हापूर विधान परिषद, जन्म- 12 एप्रिल 1972, शिक्षण- बीए
राजकीय कारकीर्द- त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचे ते पुत्र आहेत. 1992-93 शिवाजी विद्यापीठाच्या कौन्सिल निवडणुकीपासून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली. मौनी विद्यापीठ डॉट डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना तसेच डी वाय पाटील समूहाच्या शिक्षण संस्था वर अध्यक्ष म्हणून त्यांचे काम आहे. 2004 ला तत्कालीन मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा करवीर मतदारसंघातून त्यांनी पराभव केला. 2009 ला दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडणून आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2014 ला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर 2015 ला विधान परिषदेच्या माध्यमातून ते पुन्हा आमदार झाले. पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या यशातही त्यांचा वाटा आहे. काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष म्हणून सतेज पाटील कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आघाडीत समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांच्यासह सहा आमदार निवडून आणले. सतेज कृषी प्रदर्शन, सतेज फेस्ट, गृहिणी महोत्सव, असे उपक्रम ते सातत्याने राबवतात.
हसन मुश्रीफ- मतदार संघ- कागल, जन्म- 24 मार्च 1954, शिक्षण- बीए (ऑनर्स)
राजकीय कारकीर्द - कागल पंचायत समिती सदस्य सभापती ते सलग पाच वेळा आमदार अशी त्यांची यशस्वी राजकीय वाटचाल आहे. 1997 ला कागल पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत संजय घाडगे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2000 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडूण आले. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा राजकीय शिष्य म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली. त्यानंतर सलग पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात सह सोळा वेगवेगळ्या खात्यांचा कार्यभार यशस्वीपणे त्यांनी सांभाळला. पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न त्यांनी केले. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ते महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून राष्ट्रवादीने काही ठिकाणी यश देखील मिळवले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. पक्षाचा मुस्लीम चेहरा म्हणून शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना वेळोवेळी बळ दिले. सध्या ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
प्रकाश अबीटकर- मतदारसंघ- राधानगरी,भुदरगड, जन्म- 30 जून 1974, शिक्षण- एम ए
राजकीय कारकीर्द- साखर कामगारांचा मुलगा ते आमदार असा संघर्षमय प्रवास त्यांचा राहीला आहे. 1997 ला भुदरगड पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडूण आले होते. 2000 ला भुदरगड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. 2002 ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 2009 ला पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. 2014 आणि 2019 ला राधानगरी भुदरगड मतदारसंघातून माजी आमदार के.पी पाटील यांचा त्यांनी पराभव केला. 2014 ला शिवसेना प्रवेशानंतर भुदरगड परिसरात पक्षबांधणीसाठी त्यांनी काम केले. विविध विषयावर विधानसभेत आवाज उठवणारा शिवसेनेचा चेहरा म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. भाऊ अर्जुन आबिटकर माजी जिल्हा परिषद सदस्य तर वहिनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीतही आपल्या गटाचे सदस्य निवडून आणून मतदारसंघात ताकद दाखवली आहे.