कोल्हापूर - साखर सहसंचालक कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला. सहसंचालकांना भेटण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला. एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कारखाने सुरू होऊन अडीच महिन्यांतून अधिक काळ पूर्ण झाला आहे, तरीही कारखानदारांनी ज्या साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिली नाही, अशा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, साखर आयुक्तांचे आदेश पोहोच करण्यावरून साखर उपसंचालक कार्यालय आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात समन्वयाचा अभाव गुरूवारी पाहायला मिळाला. या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात गुरूवारी कोल्हापूरमध्ये जोरदार वादावादी झाली.
संतप्त कार्यकर्त्यांनी याठिकाणी एकच गोंधळ घातला. शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर उपमुख्य निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे कार्यकर्ते गेले. शेवटी ८ दिवसांच्या आत साखर कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन, अधिकाऱ्यांनी संतप्त आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. परंतु, जर ८ दिवसात याबाबत काही कार्यवाही झाली नाही, तर स्वाभिमानी पद्धतीने आम्ही आमचे पैसे वसूल करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.