कोल्हापूर - आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संविधान, लोकशाही आणि धर्म निरपेक्षता या विचारावर अढळ विश्वास असणाऱ्या छोट्या पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. मात्र, त्याच घटक पक्षांचा विसर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी झाला असल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी व्यक्त केले.
ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय चौकशीची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण दिले. मात्र,ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःचं नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले त्या सर्व घटक पक्षांना मात्र शपथविधीपासून बेदखल केले असल्याचे ते म्हणाले. याची भविष्यात यांना याची किंमत चुकवावी लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी आज विधानभवन परिसरात पार पडला. यावेळी एकूण ३६ जणांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळविस्तारात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना स्थान देण्यात आले नाही. शिवाय शपथविधीचेही निमंत्रण देण्यात आले नाही. यासगळ्या घडामोडीवर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात राजू शेट्टींना सुद्धा मंत्रिपद मिळेल अशी चर्चा रंगली होती. मात्र मंत्रिपद सोडा, शपथविधीला निमंत्रण सुद्धा दिले नसल्याने राजू शेट्टी चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे.