कोल्हापूर - विधानसभा निवडणूक काही दिवसावर असताना आघाडीसह राजू शेट्टींना मोठा धक्का बसला आहे. आघाडीमधील ३ जणांनी आज शुक्रवारी चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये स्वाभिमानीचे १, राष्ट्रवादीचे १ तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.

हे वाचलं का? - भाजप सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून सामाजिक चळवळी दडपण्याचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे स्वाभिमानीच्या स्थापनेपासून राजू शेट्टींसोबत आहेत. त्यांनी ऊस दराबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, आता त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या संगीता खाडे आणि काँग्रेसचे दौलत देसाई यांनी देखील भाजप प्रवेश केला आहे. यामुळे आघाडीसह शेट्टींना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर एकामागोमाग एक जुने सहकारी सोडून चालल्यामुळे राजू शेट्टींच्या चिंतेत वाढ झाली आहे.