कोल्हापूर - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ झाले पाहिजे, युवकांना बेरोजगारी भत्ता मिळावा, प्रत्येक बेरोजगार युवकांना किमान १० हजार रुपये बेरोजगारी भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन कोल्हापूरने दसरा चौकात आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, वारंवार फेडरेशनकडून मागण्या केल्या जातात मात्र, त्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटले.
आम्ही सर्वांनी सबुरीने घेतले होते. मात्र, विद्यार्थ्यांना दिलासा देईल, असा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलले जाते, उद्योजकांच्या कर्जमाफीबाबत बोलले जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार देशातील विद्यार्थ्यांच्या नावावर जवळपास 75 हजार कोटींचे शैक्षणिक कर्ज आहे. कोरोनासारखे महाभयंकर असे संकट जगासमोर आणि देशासमोर आहे. या संकटकाळात त्यांच्या कर्जाचे हप्तेसुद्धा थांबविण्यात आले नाहीत. ते सुद्धा थांबवून कर्ज माफ झाले पाहिजे असे फेडरेशनचे गिरीश फोंडे यांनी म्हटले आहे.
शिवाय पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून सरकार जनतेवर महागाई लादत आहे. ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवत आहेत, त्या सर्व कंपन्यांचे खाजगीकरण करून विकल्या जात असल्याचेही फोंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्वांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याची वेळ असल्याचे त्यांनी म्हटले. आहे.