कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य आणि विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, ही भावना समोर ठेवून थोर समाजसुधारक माधवराव बागल यांनी कोल्हापुरात दोघांचेही पुतळे उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळा प्रतिमा समिती सुद्धा बनविण्यात आली. या समितीचे माधवराव बागल अध्यक्ष होते. 9 डिसेंबर 1950 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांचे ब्रॉन्झमधील दोन पुतळे उभारण्यात आले.
प्रसिद्ध पुतळा : कोल्हापूरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे हे पुतळे उभारण्यात आले. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्येच हा पुतळा उभारला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा हा जगातील पहिलाच पुतळा ठरला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर एकदा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी या ठिकाणी भेट देऊन पुतळा पाहिला होता, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली. माधवराव बागल यांनी प्रसिद्ध शिल्पकार बाळ चव्हाण यांच्याकडून आंबेडकरांचा हा विशेष पुतळा बनवून घेतला होता.
जनतेच्या हस्तेच पुतळ्यांचे अनावरण : कोल्हापूरातील ऐतिहासिक बिंदू चौकात उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. माधवराव बागल यांनी या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कोणत्याही मोठ्या व्यक्तीला बोलावले नाही. पुतळ्यांचे अनावरण करवीरमधील जनतेच्या हस्ते करण्याचे ठरले. त्यानुसार बागल यांनी 9 डिसेंबर 1950 रोजी करवीर म्हणजेच कोल्हापूरातील बिंदू चौक येथे आयोजित कार्यक्रमस्थळी आलेल्या काही सामान्य नागरिकांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. समितीकडून नगरपालिकेस तो पुतळा तत्कालीन नगराध्यक्ष द. मा. साळोखेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता. करवीर नगरीतील तरुणांना आंबेडकर यांच्याकडून सतत स्फुर्ती मिळावी, या हेतूने बनविलेले हे दोन्ही पुतळे सर्वांना प्रेरणा तर देत आहेत, शिवाय अनेक आंबेडकरवादी नागरिकांसाठी हे आदराचे स्थान बनले आहे.
ऐतिहासिक बिंदू चौकात आंबेडकरांचा पुतळा : कोल्हापूर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जे आहेत ते खुप वेगळ्या पद्धतीचे होते. त्यांचे आणि कोल्हापूरचे असणारे वेगळे नाते राजर्षी शाहू महाराजांपासून तयार झाले होते, हे सर्वांनाच माहिती आहे. शाहू महाराजांनी आंबेडकर यांना मदतही केली होती. हेच ऋणानुबंध पुढे जाऊन राजाराम महाराजांनीही कायम ठेवल्याचे इतिहास संशोधकांनी अनेकदा म्हंटले आहे. त्यांनतर बाबासाहेबांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे, त्यांचे विचार समजावेत याच भावनेतून समाजसुधारक भाई माधवराव बागल यांनी आंबेडकर यांचा पुतळा कोल्हापूरात बसविण्याचे ठरवले.
जगातला सर्वात पहिला पुतळा : त्यानुसार 1950 मध्ये कोल्हापुरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकात आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला. भारतासह जगात अनेक ठिकाणी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. यापुढे लाखो पुतळे उभारले जातील. मात्र खऱ्या अर्थाने कोल्हापूरातील या पुतळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आंबेडकर यांनी स्वतः कोल्हापूरात भेट देऊन पाहिलेला हा पुतळा आहे. जगातला सर्वात पहिला पुतळा आहे. बिंदू चौकात 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुलेंचे पुतळे उभारण्यात आले होते. पुढे दहा वर्षानंतर म्हणजेच 17 ऑक्टोबर 1960 रोजी या दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आले. या स्तंभावर स्वातंत्र्यालढ्यात हुतात्मा झालेल्या 20 हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत.