कोल्हापूर- आज जाहीर झालेला राज्याचा २०१९-२० अर्थसंकल्प हा येणाऱया विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा असून तो कधीही पूर्ण होणार नाही आणि त्यावर कोणी विश्वासही ठेवणार नसल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा पाऊस पडला आहे. पण युती सरकारने आज अर्थसंकल्प नाही तर जाहीरनामा सादर केल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
ज्या घोषणा केल्या आहेत त्या तीन महिन्यात पूर्ण होणार नाहीत. या आधीही सरकारने शेतकऱयांना दीड पट हमीभाव व कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. हे सर्व आश्वासने हवेत मुरली आहे. या अर्थसंकल्पात नुसते 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी' असून त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे ते म्हणाले. साडे चार वर्षांत काही केले नाही तर आता तीन महिन्यात काय करणार, अशी टीका देखील राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात बोलताना केली.