कोल्हापुर - महावितरण आणि राज्य शासनाच्या विरोधात सोमवारी संपूर्ण शिरोळ बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शिरोळमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आलाय. तालुक्यात सक्तीने वीजबिल वसुली सुरू असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला असून यात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन 'आंदोलन अंकुश'ने केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
शिरोळमध्ये सर्व व्यवसाय बंद
आठवडाभर महावितरणाकडून वीज बिल वसुलीसाठी वेठीस धरले जात आहे. वीज ग्राहक आर्थिक अडचणीत आहे हे माहित असूनही बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन कट करतो असे धमकावून जबरदस्तीने बिल वसुल केली जात आहे. राज्य शासन वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडून तर दिले आहे मात्र थकीत बिल वसुली करण्यासाठी वेळ पडल्यास ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची खुली छूट महावितरणला दिली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून वीज ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचे म्हणत 'आंदोलन अंकुश'ने बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिरोळमध्ये सर्वच व्यवसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवले आहेत.
भरमसाठ बिले माफ झालीच पाहिजेत
लॉकडाऊन काळात आलेली भरमसाठ बिले, चुकीचे आकारण्यात आलेले इतर कर, बेकायदेशीर आकारण्यात आलेला स्थिर आकार आणि 18% व्याज दंड व्याज आकारून आलेली बिल दुरुस्त न करता भरा म्हणून ग्राहकांवर होत असलेला अन्याय होत आहे. ज्या ग्राहकांनी वीज बिलाच्या तक्रारी केल्या आहेत त्यांचीही कनेक्शन बळजबरीने कट केली जात आहेत. तसेच घरगुती वीज ग्राहकांना नोटीस न काढता शिरोळ तालुक्यातील काही गावात वीज कनेक्शन कट करण्याच्या महावितरणाच्या बेकायदेशीर कृती विरोधात आंदोलन अंकुशने पुकारलेल्या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. तालुक्यातील विविध भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, कोणत्याही पद्धतीने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.