कोल्हापूर - सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होताना पहायला मिळत आहे. यामध्ये महिलांना प्रचंड त्रास होत आहे आणि म्हणूनच महिलांना लसीकरणात 50 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत-मांडरे यांनी ही मागणी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
'प्रत्येक केंद्रावर 50 टक्के पुरुष आणि 50 टक्के महिलांचे लसीकरण करावे'
स्मिता सावंत-मांडरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रावर बघितल तर जमणारी गर्दी आणि तिथून रांगेत अपेक्षेने उभे राहिलेल्या महिला हे चित्र खूप विदारक आहे. अनेक महिला घरातील कामं आवरून आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत असतात. प्रत्येक केंद्रावर जर 250 लसीचे डोस येणार असतील तर त्यामध्ये 125 महिला आणि 125 पुरुषांचे लिसीकरण करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या बागेश्री देशपांडे उपस्थित होत्या.
लसीकरणात कोल्हापूर आघाडीवर
जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 9 लाख 20 हजार नागरिकांनी पहिला डोस तर 2 लाख 30 हजार इतक्या लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस (प्रतिबंधक लस) घेतला आहे. म्हणजेच, जिल्ह्यातील 27 ते 28 टक्के नागरिकांनी कोविड लस घेतली आहे. लसीकरणाबाबत राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. सर्वत्र लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कोल्हापूरने राज्यात बाजी मारली आहे. त्यामुळेच आता लसीकरणासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन प्रत्येक केंद्रावर याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही होऊ लागली आहे.