कोल्हापूर Shahu Maharaj on Reservation : लोकसभा हे असं स्थान आहे, जिथं सर्वांना आपले विचार व्यक्त करता येतात. काही चर्चा करता येतात ज्यात सर्व भारतीयांच्या हितासाठी योग्य निर्णय घेता येतात, त्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. नव्या संसदेत कामकाजाचा ( New Parliament Inauguration ) श्रीगणेशा करण्यात आला, या संसद भवनात लोकांच्या हिताचे कायदे व्हावेत. समान नागरी कायद्याबाबतही चर्चा ऐकायला मिळते. मात्र, हा कायदा चर्चा होऊनच झाला तर हिताचे ठरेल. तसंच आरक्षण प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारनं जनतेला झुलवत ठेवू नये, असे म्हणत कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी सरकारचे कान टोचले. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
चर्चा करुनच समान नागरी कायदा करावा : भारतीय राज्यघटना 1950 पासून घटना अस्तित्वात आलेली आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संसदेचं महत्त्व संविधानात अधोरेखित केलंय. देशात सध्या समान नागरी कायदा करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, हा कायदा करताना राज्यकर्त्यांनी चर्चा करावी आणि मगच हा कायदा करावा, असा कायदा करणे देशाच्या आणि भारतीय जनतेच्या हिताचे ठरेल असंही मत छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केलंय.
आरक्षणावर जनतेला झुलवत ठेवू नये : राज्यात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजतोय. यावर आरक्षण प्रश्नी जनतेला झुलवत न ठेवता राज्य आणि केंद्र सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा. तसंच राज्यभरातील धनगर समाजाला आरक्षण आहे. त्यांना आता ते वेगळ्या कक्षेत हवे आहे. जनतेला योग्य मार्गदर्शन करणं नेत्यांचं कर्तव्य आहे. आरक्षण मिळणार असेल तर तसं सांगणं गरजेचं आहे, मात्र नसेल मिळणार तर नाही म्हणून सांगणंही गरजेचं आहे. मात्र याबाबत सरकारने जनतेला झुलवत ठेवू नये असा सल्लाही छत्रपती शाहू महाराज यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिलाय.
हेही वाचा :