कोल्हापुर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. हा निकाल म्हणजे देशात होणाऱ्या 2024 च्या निवडणूक सत्तांतराची चुणूक आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील गतनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात साखर पेढे वाटून करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
भाजपला प्रत्युत्तर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया देताना, एक राज्य जिंकले म्हणजे देश जिंकता येत नाही असे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले, देशभरातील दोन-तीन राज्य सोडल्यास स्वबळावर भाजपचे सरकार कुठेही नाही, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे फोडलेल्या आमदारांमुळे आहे. देशभरात भाजपने केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला कर्नाटकातील जनतेने मतपेटीतून उत्तर दिल्याचे आमदार पाटील म्हणाले.
या पाच कारणांमुळे मिळाला विजय: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, राज्यातील माता-भगिनींना दहा किलो तांदूळ आणि दोन हजार रुपये, 200 युनिट मोफत वीज, बेरोजगार तरुणांना शिष्यवृत्ती, बसमधून महिलांना मोफत प्रवास योजना देणार असल्याची घोषणा केली होती. यामुळेच काँग्रेसला कर्नाटकात जनाधार मिळाल्याचे आमदार पाटील म्हणाले.
कार्यकर्त्यांनी केला आनंद साजरा: राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहता राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार येईल ही लोकांची भावना आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत महागाईने कळस गाठला आहे. मात्र देशातील सत्ताधारी मंडळी सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलत नाहीत, कोल्हापुरात 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रामनवमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात रामनवमी दिवशी भाजपचे पदाधिकारी गायब होते, हा मताच्या धुरवीकरणासाठी केलेला भाजपचा डाव आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर नृत्य करून आनंद साजरा केला.
कमिशन लाटणारे कर्नाटकातील भाजप सरकार हद्दपार: कर्नाटकातील भाजपचे सरकार 40% कमिशनचे सरकार सत्तेवर होते. या सत्तेला सुरुंग लावत भ्रष्टाचार आणि बरबटलेले भाजप सरकार हद्दपार केले. देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ही चुणूक आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतीश पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -