कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरचे नाते आता काही राहिलेले नाही. त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध आता तुटलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार आहे असे मला वाटत नाही, असा टोमणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी मारला आहे. चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सतेज पाटलांवर टीका केली होती. यावर बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
माझ्यावर बोलणे म्हणजेच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या आणि दिवसरात्र कोरोनाविरोधात लढाई लढत असलेल्या नर्सेस, डॉक्टर पोलीस यांचा अपमान आहे. चंद्रकांत पाटील आज 60 दिवसानंतर कोल्हापुरात आले आहेत. कदाचित ते आमच्यावर टीका करून पुन्हा कोथरूडला गेले असतील. ते पुन्हा 60 दिवसांनंतर परत येतील आणि एखादे वक्तव्य करून जातील, असेही सतेज पाटील म्हणाले. आज भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनावरसुद्धा सतेज पाटील यांनी उपहासात्मक टीका करत नाराजी व्यक्त केली.
कोल्हापुरात आता नावापुरते भाजप उरले आहे. त्यामुळे इथे नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हायचा काही विषयच नव्हता. शिवाय महाराष्ट्रातसुद्धा आज नागरिक त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले नसल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांना केवळ चुकीची दिशा भाजप दाखवत आहे. एकीकडे भाजप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे त्याची त्यांनी चिंता करावी. लोकांना जर महाविकास आघाडीवर विश्वास नसता किंवा अमच्याबाबत चुकीचे वाटत असते तर आम्ही ट्रोल झालो असतो तुम्ही झाला नसता, असेही पालकमंत्री म्हणाले.