कोल्हापूर - चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून लढायचा निर्णय 2019 सालीच घ्यायला पाहिजे होता. मात्र आता ही संधी गेली असल्याचा खोचक टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. कोल्हापुरात कुठूनही निवडणूक लढवली तर निवडून येईन आणि नाही आलो, तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ सतेज पाटील यांनीसुद्धा टीका केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सतेज पाटील यांनी टोला लगावला आहे. तुमचा कोल्हापूरात एकही आमदार नाही आणि तुम्ही कुणाला राजीनामा द्यायला लावता, 2019 मध्ये जेंव्हा संधी होती, तेंव्हा तुम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, आता ती संधी गेली आहे, अशी खोचक टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
5 नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन-
5 नोव्हेंबररोजी काँग्रेसतर्फे देशव्यापी आंदोलानाचे आयोजन केले आहेे. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या रॅलीची सुरुवात निर्माण चौक येथून होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
नियम पायदळी तुडवून तीन शेतकरी विरोधी कायदे आणले -
कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबित करून ही विधेयके मंजूर करुन घेतली. लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस संघर्ष करत असून नुकताच 15 ऑक्टोबररोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ या व्हर्चुअल सभेचे आयोजन केले होते. या व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून राज्यातील 10 हजार गावातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांशी काँग्रेस नेत्यांनी संवाद साधला होता. केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी कायदा आणून मोदी सरकार आपल्या अन्नदात्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेसने देशव्यापी लढाई सुरु केली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सुद्धा सतेज पाटील केले.