कोल्हापूर - करवीर तालुक्यातील निगवे खालचा गावचे वीरजवान संग्राम पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याच वीर संग्राम पाटील यांच्यासोबत तब्बल अठरा वर्षे देशसेवा केलेले नाईक सुभेदार राहुल सावंत यांनी त्यांच्या विषयीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. विशेष म्हणजे सावंत आणि संग्राम पाटील हे एकाच गावचे देशसेवा करणारे सुपुत्र आहेत. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नाईक सुभेदार सावंतांनी दिला १८ वर्षातील आठवणींना उजाळा अधिकाऱ्यांनी दिलेल्या कोणत्याही टास्कला संग्रामकडून 'ना' नाही-संग्राम पाटील हे अतिशय मनमिळावू शांत स्वभावाचे होते. कोणालाही उद्धट बोलत नव्हते, शिवाय अधिकारी वर्गाकडून कोणत्याही पद्धतीचा टास्क त्यांना देण्यात आला तर त्याला ते कधीही नाही म्हणत नव्हते. याउलट तो टास्क पूर्ण करेपर्यंत ते शांत बसत नसत. हे जीवन देशासाठी द्यायला आपण याठिकाणी आलो आहे, असे ते वारंवार म्हणायचे आणि कदाचित त्यांचे तेच शब्द खरे ठरले आहेत, अशी भावनाही त्यांचे सहकारी राहुल सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
जवानास वीरमरण आल्यानंतर तेव्हढ्यापुरताच आदर मिळतो, नंतर लोकं विसरतात - देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक जवानांच्याप्रति प्रत्येकाच्या मनात नेहमी आदर असला पाहिजे. जेंव्हा एखादा जवान शहीद होतो तेंव्हा कार्यक्रम होइपर्यंत त्याच्याबद्दल आदर आणि त्यांना सन्मान दिला जातो. मात्र काही काळाने लोक सर्व विसरतात, हे होऊ नये असेही सावंत यांनी म्हंटले.
एकाच गावातील तब्बल 105 हुन अधिक जवान - संग्राम पाटील ज्या भूमीत जन्मले त्या निगवे गावात तब्बल 105 हून अधिक जवान देशसेवा करत आहेत. त्यातील काहीजण निवृत्त झाले आहेत. मात्र अजुनही 80 हुन अधिक जवान विविध ठिकाणी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत.