कोल्हापूर- जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. मात्र,ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर नव्हती त्यावेळी प्रशासनाची भूमिका कशी होती याचा अनुभव कोल्हापुरातील गायकवाड कुटुंबाला आला. खासगी हॉस्पिटलने संगीता आनंदराव गायकवाड यांना दाखल करुन घेण्यास दिलेला नकार आणि प्रशासनाच्य नियोजनशून्यते मुळे जीव गमवावा लागला. केवळ उपचार न मिळाल्याने विनायक गायकवाड या तरुणला त्याची आई गमवावी लागली आहे. गायकवाड यांच्या अनुभवावरुन कोल्हापूर प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
शासकीय आणि खासगी रुग्णलायत बेड मिळाला नाही
कोल्हापूरातील इरा पार्क मध्ये आनंदराव गायकवाड त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचे कुटुंब सध्या दुःखाच्या छायेत आणि मानसिक दडपणाखाली आहे. गायकवाड यांची पत्नी संगीता गायकवाड यांचा २४ जुलै रोजी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. 22 जुलै रोजी अचानक संगीता गायकवाड यांना श्वासोच्छवास त्रास जाणवू लागला. अंगात ताप आल्याने त्यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले. मात्र, बेड उपलब्ध नसल्याने त्यांना घरी पाठवले. रात्री अधिक त्रास जाणवू लागल्याने मुलगा विनायक गायकवाड याने त्याच्या मित्रांच्या मदतीने कोल्हापूरातील खासगी हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र, एकही हॉस्पिटलने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचाराअभावी संगीता गायकवाड यांचा मृत्यू झाला.
मुलाने मित्रांच्या सहाय्याने आईच्या मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
संगीता गायकवाड यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या मृतदेहाचे हाल सुरू झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी महापालिकेचा एकही कर्मचारी पुढे आला नाही. अखेर विनायकला मित्रांनीच धीर देत संगीता गायकवाड यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण, गायकवाड कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढल्या. मुलगा विनायक, मुलगी, आनंदराव आणि आठ मित्रांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते सुखरूप घरी देखील परतले. आता सोसायटीमधील लोकांनी त्यांना घर खाली करा, असा निरोप पाठवलाय. त्यामुळे हरवलेल्या माणुसकीने गायकवाड कुटुंब पूर्णतः खचून गेलेय. आमच्या वाट्याला जे दुःख आले ते इतरांना येऊ नये, अशी अपेक्षा आनंदराव गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-'व्यवस्थेने आमचा आधार नेला'; सख्ख्या भावांच्या निधनाने चव्हाण कुटुंबीयांवर कोसळलं आभाळ
सध्या कोल्हापूरातील परिस्थिती हाताबाहेर गेलीय. मात्र, गायकवाड यांच्याबाबतीत घडले ती तारीख २४ जुलै २०२० होती. केवळ प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार आणि खासगी हॉस्पिटलचे पुरवण्यात आलेले लाड याच्यामुळेच विनायक गायकवाडला आई पासून मुकावे लागलेय. कोरोना विषाणू संसर्गामुळे अजून किती जीव उपचारविना जाणार हा सवाल कायम आहे.
हेही वाचा-ईटीव्ही भारत स्पेशल : उसन्या नोकरीने घेतला उमद्या बापाचा जीव, 6 महिन्यांचा चिमुकला झाला पोरका