कोल्हापूर- कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवण्याचा समरजितसिंह घाटगे यांनी निर्धार केला आहे. कागल विधानसभा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्यानंतर समरजितसिंह नाराज झाले होते. मात्र, उमेदवारी मिळाण्याबाबतची त्यांची आशा अजूनही कायम आहेत. समरजितसिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षाने याबाबत विचार करावा अन्यथा अपक्ष लढू असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सुद्धा समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. कागल येथे पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या माध्यमातून समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुद्धा केले आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या या निर्णयावरून कागल विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी अटळ असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या घोषणेपूर्वीच कोल्हापुरातील १० विधानसभा मतदारसंघांपैकी ६ विद्यमान आमदार आणि २ इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप केले. त्यानंतर भाजपच्या वाट्याला जिल्ह्यात केवळ दोनच जागा शिल्लक राहिल्या. कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघसुद्धा भाजपच्या वाट्याला मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण हे दोन्ही मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा- कोल्हापूर सोडून भाजप-सेनेची राज्यात युती? चर्चांना उधाण
कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या २ वर्षांपासून शाहू महाराजांचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. पण मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्याने आता त्यांनी थेट सेनेकडे अपेक्षा ठेवली असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा. वेळ पडल्यास सेनेकडूनसुद्धा लढू, असे देखील समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. असे नाही झाल्यास कोणत्याही परिस्थितीत अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांची बंडखोरी थांबविण्याचे मोठे आव्हान युतीसमोर आहे.