कोल्हापूर - कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ भाजप आणि रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या कबनूर गावातील शेतकरी उसाची फोडणी करत असताना सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या शेतात जाऊन औत धरण्याचा मोह आवरला नाही. दोघांनीही स्वतः औत धरून शेतकऱ्याला मदत केली.
औत धरण्याचा मोह आवरला नाही -
कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ आणि शेतकरी जागृतीसाठी भाजप आणि रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू आहे. सांगलीमधून या यात्रेला प्रारंभ झाला आहे. पुढचे 3 दिवस पहिल्या टप्प्यातील ही यात्रा पूर्ण होणार आहे. ही यात्रा कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर येथील इचलकरंजी शहरानजीक असलेल्या कबनूर गावात शेतकरी अनिल बापू माळी शेतात काम करत असताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गाडी थांबवून शेतकऱ्याला शेतातील कामात मदत केली. उसाच्या भरणीचे काम सुरू असताना त्यांना स्वतः औत धरण्याचा मोह आवरला नाही.
आत्मनिर्भर यात्रेदरम्यान शेतावरचं थांबुन मोदींचा कार्यक्रम पाहिला -
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधून पीएम किसान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. दरम्यान, किसान आत्मनिर्भर यात्रेदरम्यान एका शेतावरतीच थांबुन आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट प्रक्षेपण पाहिले.