कोल्हापूर - भाजपने आज राज्यात काळे झेंडे दाखवत आंदोलन केले, हा केवळ महाराष्ट्रद्रोह आहे. त्यांनी असे आंदोलन केल्याने दोन महिन्यांपासून राज्यात जे डॉक्टर, नर्स, पोलीस जीवाची बाजी लावून कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत त्यांचा अपमान आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार कसे आर्थिक अडचणीत येईल हाच विचार भाजपचे नेते करत आहेत. एकीकडे केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, त्यातून जनतेला काहीच लाभ होणार नाही. त्यांनी जाहीर केलेले पॅकेज केवळ कर्ज स्वरुपाचे आहे. मात्र, आमचे सरकार बारा बलुतेदारांना आणि कष्टकरी जनतेला, असे मोठे पॅकेज देईल की विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे मुश्रीफ म्हणाले.
परदेशातून मोठ्या संख्येने नागरिक भारतात परत आले. मोदींनी त्याच वेळी लॉकडाऊन कडक केले असते, तर देशातील 130 कोटी जनतेला आता हा त्रास सहन करावा लागला नसता, असेही मुश्रीफ म्हणाले. मोदींनी टाळ्या वाजवा, दिवे लावा सांगितले आणि आज भाजपने राज्यात आंदोलन केले. यामधून त्यांनी जनतेला ५० हजार कोटींचे पॅकेज द्या, अशी मागणी केली. यावरून मुश्रीफ यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यातून पंतप्रधान फंडला मोठी मदत गेली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या वाट्याला त्यातील केवळ 300 कोटी रुपये आले. उत्तर प्रदेशला 1500 कोटी दिले, हा अन्याय आहे. भाजपने अशा गंभीर परिस्थितीत आमच्यासोबत येऊन या लढण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र, त्यांच्याकडून सातत्याने राजकारणच होत असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली.