कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक कशी घेतली जाईल, याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. मात्र सत्तारूढ गटाने आत्मविश्वास गमावल्याने त्यांची कोर्टकचेरी सुरू आहे. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. ते कोल्हापूरात बोलत होते.
पुढे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीसंदर्भत अंतरिम आदेश आलेला नाही. पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे. गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे, हे याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सर्वोच्चा न्यायालयाने सांगितले आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. २६ एप्रिलनंतरचे चारच दिवस या मतदान प्रक्रियेस राहिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदान प्रक्रिया पार पडेल अशी आशा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत जिल्ह्यात केवळ ३७०० मतदार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ३५ बूथ या प्रक्रियेसाठी असणार असून प्रत्येक बूथमध्ये १०० मतदान असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, कर्नाटक व पंढरपूर पोटनिवडणूक पार पडली. मग या निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारूढ गटाचा अट्टहास का? असा सवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनीं केला. सत्तारूढ गटाला आत्मविश्वास नसेल तर कोर्ट कचेरी न करता त्यांनी निवडणुकीला सामोरे जावून दूध उत्पादकांची मानसिकता काय? हे त्यांनी तपासून पाहावे, असे आव्हान पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.