कोल्हापूर : येथील रंकाळा टॉवर परिसरातील एका डॉक्टरला काल (रविवार) कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील काही अहवाल प्राप्त झाले असून त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या महिला रिसेप्शनिस्टला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या डॉक्टरांच्या रुग्णालयात गेलेल्या अनेकांनी सध्या शहरातील सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये येऊन आपले स्वॅब दिले असल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापुरातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांचे नमुने कोरोना तपासणीकरता घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या एका रिसेप्शनिस्टलाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण नेहमी उपचारासाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आणखी किती जण आले याची माहिती घेतली जात आहे. शिवाय, महिला रिसेप्शनिस्ट ज्या परिसरात राहते, त्या अंबाई टँक तसेच तिच्या माहेरच्या बुधवार पेठ येथील परिसरसुद्धा सील करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरात 22 रुग्णांची नोंद झाली होती. महिला रिसेप्शनिस्टसह एकूण रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. या महिलेच्या आई-वडीलांसह तिच्या भावाला सुद्धा आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सुद्धा स्वॅब घेण्यात आले असून त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. यामुळे सध्या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. प्राप्त अहवालानुसार कोल्हापूरातील आणखी 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 681वर पोहोचली आहे. त्यातील जणांना 455 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 218 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.