कोल्हापूर - दूध दरवाढीच्या मागणीबाबत एका बैठकीत निर्णय होणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या आंदोलनाकडे सकारात्मकरित्या पाहून योग्य तो निर्णय घ्यावा. राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली, तर आंदोलनाची तीव्रता वाढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच आज झालेल्या चर्चेवर ते समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले.
दुग्धविकास मंत्र्यांना निर्णय घेण्याचे कितपत अधिकार आहेत? याबाबत शंका आहे, असाही टोला त्यांनी सरकारला लगावला. बैठकीत एकाने दूधपावडर तयार करणाऱ्याला अनुदान द्यावे, अशी मागणी केली. त्याला तत्काळ सर्वांनी विरोध केला, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळावे यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. शिल्लक दूधपावडरबाबत केंद्राशी बोलून पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलनाची तीव्रता वाढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कुठे मोफत दूध वाटप केले, तर कुठे टँकर फोडून दुधाची नासाडी करण्यात आली. तसेच काहींनी दुग्धाभिषेक करून सरकारला बुद्धी देण्याची मागणी केली. एकूणच या आंदोलनाला राज्यभरात चांगलाच प्रतिसाद मिळाला. तसेच याचा परिणाम दूध संकलनावर झाला असून कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात तब्बल ५० हजार लिटर दुधाचे कमी संकलन झाले, तर परभणीत आज एकही लिटर दुधाचे संकलन झाले नाही.