कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 146 वी जयंती आज (शुक्रवार) कोल्हापूरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. शाहू जन्मस्थळ येथे शासकीय जयंती साजरी झाल्यानंतर येथील दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी शाहूराजांना अभिवादन केले. यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू राजांचा कार्याचा गौराव करत जातीय विषमता नष्ट होऊन सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, असे शाहू महाराजांचे विचार असल्याचे सांगितले.
हेही वाचा... 'राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू'
माझी सरकारला खऱ्या अर्थाने ही विनंती आहे की, जातीय तेढ नष्ट करून तसेच सर्वांना शिक्षण दिले तर खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली असेल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, याठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सुद्धा दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय मंत्री विश्वजित कदम, महापौर निळोफर आजरेकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.