कोल्हापूर - कोल्हापुरातील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव हे शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत, तसेच त्यांच्यासमोर अर्धनग्न फिरत असल्याचा प्रकार करतात. असा आरोप शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी केला आहे. त्यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती आणि शिक्षक आमदारांना संस्थाचालकांनी गेटवरच ताटकळत ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काय आहे प्रकार...
सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी रुईकर कॉलनी येथील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, व धक्काबुक्की करून आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे. या विरोधात आज सर्व शिक्षक आणि नागरी संघटना कृती समितीच्या वतीने जय भारत शिक्षण संस्थेच्या समोर मूक धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांनी केलेले आरोप
शिक्षकांच्या पगारातून दरमहा एक दिवसाचा पगार कपात करणे, वरिष्ठ निवड, वेतन श्रेणी न देणे, तसेच ते देण्यासाठी लाखो रुपये लाच घेणे, वेतन आयोगातील संपूर्ण फरक शिक्षकांकडून काढून घेणे, शिक्षकांकडून घरची साफसफाई करणे, असे प्रकार घडत असल्याचा आरोप देखील यावेळी शिक्षकांनी केला.
स्वतःच्या पाहुण्यांची बडदास्त ठेवणे, महिला शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, महिलांना टोमणे मारणे, त्यांच्यासमोर अर्धनग्न अवस्थेत शाळेत फिरणे, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील महिला शिक्षकांनी केला आहे. किरकोळ रजा, प्रसुती रजा न देणे, दिल्यास त्या दिवसाचा पगार शिक्षकांकडून रोख स्वरुपात काढून घेणे, असा प्रकार घडत असल्याचा आरोप देखील महिला शिक्षकांनी केला आहे.
हेही वाचा - वडगावमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 39 जण ताब्यात
या विरोधात आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेवर मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान यावेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिक कृती समितीला शाळा संस्थाचालकांनी गेटवरच ताटकळत ठेवल्याने बराच काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. महिला शिक्षकांना शिवीगाळ करणारे संस्थाचालक जाधव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
पोलिसांत गुन्हा नोंदी
संजय पाटील यांनी सर्व शिक्षकांसह शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अदखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी संस्थेला भेट दिली. शिक्षकांचा संताप पाहून त्यांनी देखील संस्थाचालकांची कान उघडणी केली. मात्र, संस्थाचालकांनी जवळपास तासभर आमदारांना गेटवर ताटकळत ठेवले. संस्थाचालक जाधव हे मद्यधुंद अवस्थेत शाळेत येतात. आमच्या समोर अर्धनग्न अवस्थेत फिरतात. शिवीगाळ करणे, आम्हाला कुमारी माता संबोधने असे प्रकार करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. असे मत शिक्षिका उज्वला पुनान्द्रे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, असा कोणताही प्रकार आमच्या शिक्षण संस्थेमध्ये घडला नाही. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी बनाव रचला आहे. असे प्रकार घडत असते तर त्यांनी त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला हवे होते. केवळ शिक्षण संस्थाचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण उपसंचालकांनी येऊन चौकशी करावी. जर चुकीचे घडले असेल तर ते कारवाई करतील, असे मत संस्थाचालिका सुमित्रा जाधव यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला